महत्वाच्या बातम्या

 बर्ड फ्लूने टेन्शन वाढवले : केरळमध्ये बदकांना लागण, दक्षिणेतील राज्यांत ऍलर्ट जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / बिहार : हिंदुस्थानात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. केरळच्या अलाप्पुझा जिह्यातील गावांत पाळीव बदकांमध्ये एच ५ एन १ विषाणू तथा बर्ड फ्लूची साथ पसरल्यानंतर दक्षिणेतील राज्यांमध्ये ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.

पक्ष्यांकडून मानवांत संक्रमण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेजारी राज्य तामीळनाडू ही साथ राज्यात येऊ नये यासाठी सक्रिय झाले आहे. वालायार व वेलांथावलमसारख्या प्रमुख चेकपॉइंटवर सर्व वाहनांची तपासणी होत असून, केरळातून कोणतेही पाळीव पक्षी, अंडी, मांस वा त्यांची विष्ठा येऊ नये यासाठी सर्व वाहने सीमेवरूनच परत पाठवण्यात येत आहेत.

पाळीव बदकांमधून ही साथ पसरल्याचे निश्चित झाल्यावर केरळच्या कुट्टनाड आणि इतर साथग्रस्त गावांमध्ये शुक्रवारी बाधित पक्षी मारण्यात आले. तामीळनाडूने केरळशी सामाईक सीमेवरील १२ चौक्यांवरून राज्यात प्रवेश करणाऱ्या ट्रकवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू केली आहे. तिथे सध्यातरी बर्ड फ्लूचे एकही उदाहरण आढळलेले नाही.

२१ हजार बदके आणि सर्व पाळीव पक्षी मारणार -

बर्ड फ्लूचे पेंद्रबिंदू असलेल्या एडथुआ आणि चेरुथनामध्ये जवळपास २१ हजार बदके मारली जाणार आहेत. याव्यतिरिक्त, प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील सर्व पाळीव पक्षी मारले जातील. अद्याप या भागातील रहिवाशांमध्ये बर्ड फ्लूची लागण आढळलेली नाही. मात्र, श्वसनाचा त्रास असल्यास वा जाणवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

काय काळजी घ्याल?

कोंबडी, बदक, लहान पक्षी, हंस, टका यांसारख्या पक्ष्यांना या रोगांची लागण होते. या संक्रमित पक्ष्यांच्या जवळ असणारे लोक, पक्षी पाळणारे, पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना केरळमध्ये देण्यात आल्या आहेत. जे संशयित संक्रमित पक्षी हाताळतात त्यांनी हातमोजे आणि चेहरा झाकणे आवश्यक आहे. आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावेत. फक्त चांगले शिजवलेले मांस आणि अंडी खावीत.

बर्ड फ्लूची लक्षणे - अंगदुखी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थंडी वाजणे 





  Print






News - World




Related Photos