बनावट धनादेश आणि खोट्या सह्यांच्या सहाय्याने जिल्हा परिषदेला घातला २ कोटी ८६ लाखांचा गंडा


- गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली:
जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागात २  कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रूपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले असून बनावट धनादेश, अतिरीक्त कार्यकारी अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून हा कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागांतर्गत तलावांची पुनर्बांधणी व बळकटीकरण लेखाशिर्षामध्ये गडचिरोली येथील युनियन बॅंकेच्या खात्यात अंदाजे ६ कोटी रक्कम जमा करण्यात आली होती. या खात्याची शहनिशा केली असता जि.प. कडील लेखाशिर्ष व बॅंकेतील रक्कमेबाबत ताळमेळ जुळून आला नाही. याबाबत बॅंकेत जावून शहनिशा केली असता मुळ धनादेश जिल्हा परिषदेकडे असताना त्याच क्रमांकाचा बनावट धनादेश तयार करून रक्कमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. यासाठी अधिकाऱ्यांच्या सह्या स्कॅन करून वापरण्यात आल्या. तसेच बनावट पत्रसुध्दा तयार करण्यात आले. ३  जून २०१९ रोजी बनावट पत्र तयार करून ७ जून रोजी धनादेश बॅंकेत जमा करण्यात आला. बनावट पत्रावर असलेल्या पाच खाते क्रमांकावर १० जून रोजी आरटीजीएसद्वारे सदर रक्कम वळती करण्यात आली.  भंडारा, वरोरा, चंद्रपूर, वर्धा अशा आजूबाजू परिसरातील बँकेतून सदर व्यक्तीने रक्कम उचल केली असली असल्याचेही बँकेच्या अहवालातून माहिती पुढे येत आहे.  याबाबत शहनिशा केल्यानंतर जिल्हा जलसंधारण अधिकारी  भूमेश दमाहे यांनी आज १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६५ , ४६८ , ४७१ , ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत असून सबंधितांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रदिप चौगावकर करीत आहेत. गुन्हे दाखल झाल्यामुळे खळबळ निर्माण झाली असून जिल्हा परिषद आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos