महत्वाच्या बातम्या

 १४ ते १७ एप्रिल कालावधीत २ हजार ३६० मतदार करणार गृहमतदान


 - मतदानाच्या गोपनीयतेसह आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा सज्ज
- जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : १३ - भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावाता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना हा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागातर्फे विहित प्रक्रिया पूर्ण करून आता हे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. १४ ते १७ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ३६० मतदान गृहमतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज गृहमतदानाची माहिती देण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनीधींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे,  उपविभागीय अधिकारी (नागपूर शहर) सुरेश बगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यावेळी उपस्थित होते. 

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजार ३४१ पात्र मतदारांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली. यात ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १ हजार २०४ आणि दिव्यांग मतदारांची संख्या १३७ आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १ हजार १९ पात्र मतदारांनी गृह मतदानाची इच्छा दर्शविली आहे. यात  ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या ८८९ आणि दिव्यांग मतदारांची संख्या १३० गृहमतदार असणार आहेत. गृह मतदानासाठी जाण्यापूर्वी निवडणूक विभागाचे कर्मचारी संबंधित मतदारांशी समन्वय साधून असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

निवडणूक विभागातर्फे या गृहमतदानासाठी नागपूरसाठी १६० टीम तयार करण्यात आल्या असून यात ४८० अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १०५ टीम तयार करण्यात आल्या असून यात ३१५ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही गोपनीयतेचे निकष व मतदान प्रक्रियेच्या नियमावलीनुसार गृह मतदानवेळी हजर राहता येईल. 

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग बांधवांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांकडून नमुना १२ – डी भरून घेण्यात आला आहे.

गृहमतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक, व्हिडीओग्राफर, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी सोबत राहणार आहे. गृहमतदानाची पूर्वसूचना बीएलओमार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची आत्यंतिक काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos