महत्वाच्या बातम्या

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून १८ हजार शेतकऱ्यांना लाभ :२३ ऑनलाइन तक्रारीचा निपटारा सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. आज जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीने (DLC) बहुतांश तक्रारी निकाली काढल्या असून कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे यांनी आज जिल्हास्तरीय बैठकीत दिली.

ऑनलाइन व ऑफलाइन तक्रारींचा निपटारा -
जिल्हास्तरीय समितीकडे (DLC) आतापर्यंत २०४ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८१ तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, सध्या केवळ २३ तक्रारी प्रलंबित आहेत. या शिल्लक तक्रारींची यादी समितीमार्फत जोडण्यात आली आहे. दुसरीकडे, जिल्हा व तालुका स्तरावर प्राप्त झालेल्या सर्व ३६ ऑफलाइन तक्रारी पूर्णपणे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

२३ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण -
भंडारा जिल्ह्यात एकूण २६,७४२ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यापैकी २३,०४४ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण (e-KYC) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप ३,६९८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असून, जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी हे काम पूर्ण करण्याचे  निर्देश अधिनस्त्‍ यंत्रणांना दिले.

आधार प्रमाणिकरण शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांपैकी १,८४५ शेतकऱ्यांकडे अद्याप ॲग्रीस्टॅक (AgriStack) किंवा फार्मर आयडी उपलब्ध नाही. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCCB) १,१३७ शेतकऱ्यांचा आणि राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांच्या ७०८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

१८,४३० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ -
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,४३० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांपैकी १,०२८ शेतकऱ्यांना ₹४ कोटी २१ लाख एवढ्या रकमेचे नवीन खरीप कर्जवाटप देखील करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे यांनी दिली.





  Print






Related Photos