अपघाताने हिरावली दोन लेकरांची आई : जाता जाता चौघांच्या जगण्याचा बनली श्वास!

- मनीषा बडगे यांचे अवयवदान; दोन रुग्णांना मिळणार दृष्टीची नवी भेट
- दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नियतीच्या एका भीषण अपघाताने दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हिरावले. १२ वर्षीय अरिहंत आणि आठ वर्षीय अविरा यांना आता आईची माया कायमची मुकणार आहे. पती आणि वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. मात्र, या दुःखाच्या प्रसंगातही मनीषा बडगे यांच्या कुटुंबीयांनी माणुसकीचे दर्शन घडवत अवयवदानाचा निर्णय घेतला. स्वतःच्या लेकरांना मायेची सावली देऊ न शकणारी ही आई जाता जाता चार रुग्णांना जीवनदान आणि दोन रुग्णांना दृष्टीची नवी आशा देऊन गेली.
मनीषा सागर बडगे ४१ वर्षे रा. जळगाव या १७ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने अमरावती येथील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली.
डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर ब्रेन स्टेम डेथ समितीने त्यांना मेंदूमृत घोषित केले. कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत वेदनादायी होता. दोन लहान मुलांची आई कायमची दुरावल्याचे दुःख असतानाही त्यांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला.
कुटुंबीयांच्या या निर्णयामुळे मनीषा यांच्या अवयवांद्वारे चार गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याची संधी उपलब्ध झाली, तर नेत्रदानामुळे दोन रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येण्याची आशा निर्माण झाली आहे. एका अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावला; मात्र त्याच कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नव्या आयुष्याची आशा मिळाली. मनीषा बडगे यांचे हे अवयवदान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.




Petrol Price




