महत्वाच्या बातम्या

 पाण्याविना शाळा, समस्यांत विद्यार्थी : सातारा कोमटीत युवासेनेचा आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, मुतारी, शौचालय तसेच शाळेतील दैनंदिन कामांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

शाळेतील पाण्याची समस्या नवीन नसून, याबाबत यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठविताना त्यांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा यांना निवेदन देऊन शाळेतील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी यांच्याशी शाळेतील पाण्याच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने घेत लवकरच शाळेत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शाळेत नियमित पाणीपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शौचालय व स्वच्छतेसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळेत कायमस्वरूपी व नियमित पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

१५ दिवसांत पाणी न मिळाल्यास भीक मांगो आंदोलन -
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार १५ दिवसांच्या आत शाळेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न दुर्लक्षित राहिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार, रजत ढोंगे, शाळा व्यवस्थापन समिती सातारा येथील अध्यक्ष लतिश ठाकरे, उपाध्यक्ष विजय सिडाम, सदस्य महिंद्र सोनुले, सदस्य सुरेखा गुरनुले, महेश ठाकरे, अजित भडके, प्रीतम भडके, नितीन गुरनुले, सत्यपाल कुळमेथे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे सातारा कोमटी जिल्हा परिषद शाळेतील पाण्याचा प्रश्न प्रशासनाने तातडीने निकाली काढून विद्यार्थ्यांना नियमित पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा पालक व युवासेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.





  Print






Related Photos