महत्वाच्या बातम्या

 निवडणूक प्रचारासाठी तत्परतेने परवानग्या : निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघातील निवडणूक रिंगणात असलेल्या़ उमेदवारांना निवडणूक प्रचार करण्याकरिता आवश्यक असलेल्या परवानग्या मुदतीच्या आत किंवा शक्य तितक्या तत्परतेने निवडणूक प्रशासनाकडून दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था, उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारांना निवडणूक प्रचार करण्याकरिता मतदार संघात वाहन फिरविणे, सभा घेणे तसेच पोस्टर बॅनर, छापील प्रचार साहित्य, ऑडिओ-व्हिडीओ प्रचार साहित्य याबाबतच्या परवानग्या संपूर्ण मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एक खिडकी येथे देण्यात येणार आहे. तसेच सहा विधानसभा मतदार संघात प्रचार करावयाचा असल्यास संबंधित मतदार संघापुरतीच परवानगी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कार्यालय येथे दिली जाणार आहे. तसेच यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्च मर्यादेची माहिती उमेदवारांना देण्यात आली.

प्रचार साहित्याचा मजकूर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कडून तपासणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा प्रतिनिधींनी किमान जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस पुर्वी प्रमाणीकरणासाठी अर्ज सादर करावा. अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर उमेदवारांनी सात दिवसपुर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) समितीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासात निकाली काढणे बंधणकारक आहे. प्रचारासाठी आवश्यक परवानगी लागल्यास उमेदवारांचे प्रतिनिधी व प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यात यावे, असे आवाहन राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.

यावेळी सुजाता गंधे यांनी ८५ वर्षावरील मतदारांच्या घरपोच मतदान करण्याची माहिती, १२-डी अर्ज भरुन दिलेल्या दिव्यांग मतदारांसाठी मतदानाची सुविधा तसेच टपाली मतदानाची माहिती दिली. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. यावेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.





  Print






News - Wardha




Related Photos