आता तेलुगूमध्येही 'नटसम्राट', दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'हा' लोकप्रिय कलाकार साकारणार आप्पासाहेब बेलवलकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : 
कुणी घर देता का घर?, असं म्हणत हतबल होऊन रस्त्यावर फिरणाऱ्या आणि आपलं गतवैभव शोधणाऱ्या महान कलाकाराची शोकांतिका मांडणारी कलाकृती म्हणजे नटसम्राट. शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकातल्या गणपतराव म्हणजेच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा नाट्यरसिकांना भावली आणि या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला. प्रत्येक मराठी रसिकाच्या मनावर या नाटकाचं गारूड आजही कायम आहे. याच नाटकावर आधारित नटसम्राट हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरला. आता हाच नटसम्राट  तेलुगूमध्येही येणार असून  आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेसाठी अभिनेता प्रकाशराज यांच्या  नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. 

या नाटकात नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रसिकांच्या काळजात घर करून गेली. आता नटसम्राटची भुरळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही पडली आहे. नटसम्राट या चित्रपटाचा तेलुगूमध्ये रिमेक बनवण्यात येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कृष्णा वामसी यांनी तेलुगू नटसम्राट चित्रपटाचं शिवधनुष्य उचललं आहे. नटसम्राट या मराठी चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारलेली आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका तेलुगूमध्ये साकारण्यासाठी कृष्णा वामसी तगड्या कलाकाराच्या शोधात होते. त्यांचा हा शोध अभिनेता प्रकाशराज यांच्यावर येऊन थांबला.

या भूमिकेसाठी वामसी यांनी प्रकाशराज यांना विचारणा केली आणि प्रकाशराज यांनीही आप्पासाहेब बेलवलकर या भूमिकेसाठी होकार दिला आहे. कलाकार म्हणून वाढ होण्यास या भूमिकेचा फायदा होईल असा विश्वास प्रकाशराज यांना वाटत आहे. तेलुगू नटसम्राट चित्रपटाबाबत कृष्णा वामसी यांच्याकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
  Print


News - Rajy | Posted : 2019-10-19


Related Photos