लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक


- राष्ट्रीय मतदार दिन विशेष 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
गडचिरोली : 
जानेवारी महिन्यात महत्वाचा असा एक राष्ट्रीय सण २६ जानेवारीला साजरा केल्या जातो; परंतु फार कमी लोकांना २५ जानेवारीचे दिनविशेष माहिती आहे. २५ जानेवारी हा मतदार दिन म्हणून भारतभरात साजरा केला जातो. गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी मतदार दिन साजरा करण्या मागचे कारण असे की भारताने आपले संविधान स्वीकारण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण मतदारच आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात.
भारत सरकारने नागरिकांचे निवडणुकीत योगदान वाढावे या साठी २०११ पासून मतदार दिन साजरा करण्याचे ठरविले. या वर्षी म्हणजेच २५ जानेवारी ला भारत ८ वा मतदार दिन साजरा करेल. उपरोक्त कार्यक्रम हा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर साजरा करण्यांत येणार आहे. या वर्षी साजरा होणा-या राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी नव्याने नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना निवडणूक छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्ले समारंभपूर्वक देणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नांव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-24


Related Photos