सामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर नांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळबाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 वर्धा :
सन 2015 चा ऑक्टोबर महिना. पावसाच्या कमतरतेमुळे मदनी या गावातील शेतकऱ्याने 15 एकर सोयाबीनवरून नांगर फिरवला. याच्या मोठ्या बातम्या tv चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये झळकल्या होत्या.  पण त्याच शेतकऱ्यासाठी  2018 चा ऑक्टोबर महिना सुखद ठरत आहे. आज त्यांच्या शेतात 15 एकरवर फळबाग बहरली आहे. केवळ एका पावसामुळे नांगर फिरवावा लागणाऱ्या त्यांच्या शेतीत ही किमया केली ती सामूहिक शेततळे आणि सोलर पंपाने. 
वर्धा तालुक्यातील मदनी गावातील माधव वानखेडे या शेतकऱ्यांची ही कहाणी आहे. 25 एकर शेती असणाऱ्या या शेतक-याची  संपूर्ण शेती जिराईत होती. 2015 मध्ये जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. त्या दुष्काळाचा फटका सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसणाऱ्या आणि वीज जोडणी नसणाऱ्या वानखेडे सारख्या शेतकऱयांना बसला. त्यांनी त्यांच्या 15 एकर सोयाबीनचे पीक नांगरले. यावेळीं वानखेडे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेततळे देण्याची मागणी केली. माधव वानखेडे यांनी सामूहिक शेततळ्याचा लाभ घेतला. 56 मीटर * 45  मीटर * 5.5 मीटर असे मोठे सामूहिक शेततळे त्यांनी तयार केले. तसेच शासनाच्या सौर कृषी पंप योजनेमधून त्यांना  7.5 hp सोलर पंपचा  सुद्धा लाभ मिळाला. त्यांच्याकडे पाणी आणि वीज अशा दोन्ही सुविधा उपलब्ध झाल्यावर 
त्यांनी जिराईत शेती संपूर्णपणे ओलीताखाली आणली. 5 एकरात केळी आणि  8 एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. तसेच आंतरपीक म्हणून सोयाबीन  व हरभरा या पिकांचेही त्यांनी उत्पादन घेतले. 
          मागील वर्षी केळीच्या उत्पादनातून त्यांना 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून खर्च वजा जाता 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आंतरपिकातून 1.50 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. तर डाळिंबाचे उत्पन्न यावर्षी पासून सुरू होत आहे. मुख्य म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी त्यांनी  फळबागेला  ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला.  सामूहिक शेततळ्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.  सोलर पंपामुळे माझी विजेची आणि पैशाची बचत होत आहे. शिवाय पिकांना वेळेत पाणी मिळाल्यामुळे उत्पन्नात सुद्धा भर पडली. लोड शेडिंग मुळे रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची आता गरज पडत नाही. असे माधव वानखेडे यांनी सांगितले.

- मनीषा सावळे 

जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा   Print


News - Wardha | Posted : 2018-11-12


Related Photos