अहेरी येथील नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्यावर जातिवाचक व अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
वकील असलेल्या युवतीला अश्लिल तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अहेरी येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात आज १६ ऑक्टोबर रोजी  भादंवि कलम २९४ ब , ३२३ , ५०४, ५०६, ३४ अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तक्रारदार वकील युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती चंद्रपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खासगी वकीली करते. काही दिवस चंद्रपूर तर काही दिवस आलापल्ली येथे वास्तव्य करते. एप्रिल  २०१८ मध्ये युवती उपविभागीय कार्यालयात कामानिमित्त गेली होती. यावेळी आरोपी नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्याशी तिची ओळख झाली. यावेळी त्यांनी युवतीचा संपर्क क्रमांक लिहून घेतला. १० दिवसानंतर शेतीची विक्री रजिस्ट्री करायची असल्यामुळे ऑर्डर घेण्यासाठी युवतीने नायब तहसीलदार खोत यांच्याशी संपर्क साधला.  यानंतर अंदाजे एक ते दीड महिन्यानंतर खोत यांनी युवतीच्या मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही सुंदर आहात, ॲडव्होकेट आहात यामुळे तुमच्याशी लग्न करायचे आहे, असे म्हटले. मात्र खोत हे वयस्कर असल्यामुळे युवतीला संशय आल्याने तिने कोल्हापुर जिल्ह्यातील खोत यांच्या मुळ गावी चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांचा विवाह झाला असल्याचे व दोन मुले असल्याची माहिती युवतीला मिळाली. तसेच त्यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.  यानंतर युवतीने खोत यांच्याशी संपर्क तोडले.
मागील सहा महिन्यांपासून खोत हे नवीन क्रमांकावरून युवतीशी संपर्क साधत होते. तिला भेटायला बोलावीत होते. तसेच वारंवार त्रास देत होते. यामुळे त्यांचा क्रमांक ब्लाॅक केला होता. यानंतरही ते चंद्रपूर येथे युवतीला भेटायला जावून त्रास देत राहिले. खोत यांचे अहेरी येथेही काही महिलांसोबत संबंध होते, असे युवतीने तक्रारीत नमुद केले आहे. अन्य महिलांसोबत संबंध असल्याने माझ्याशी संपर्क ठेवू नका, असे युवती खोत यांना सांगत होती. मात्र खोत हे ऐकत नव्हते. 
१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३०  वाजताच्या दरम्यान नायब तहसीलदार खोत यांच्या मोबाईलवरून युवतीला काॅल आला. यावेळी खोत यांची पत्नी बोलत होती. तिनेही युवतीला माझ्या पतीला त्रास दिल्यास जिवे मारेन अशी धमकी दिली. यानंतर परत खोत यांच्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी तुला जे करायचं ते करून घे, अशी धमकी दिली. यानंतर काल १५ ऑक्टोबर रोजी युवती खोत यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेली. यावेळी नायब तहसीलदार दिनकर खोत यांनी युवतीला अश्लिल व जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. खोत यांच्या पत्नीनेही हात पकडून लाथांनी मारहाण केली. यावेळी खोत यांनी शिवीगाळ करणे सुरूच ठेवले होते. यामुळे युवतीने अहेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी नायब तहसीलदार खोत व त्यांच्या पत्नीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नायब तहसीलदार खोत हे अहेरी येथे रूजू झाल्यापासून वादग्रस्त राहिल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचे हे तिसरे प्रकरण असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास अहेरी पोलिस करीत आहेत.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos