महत्वाच्या बातम्या

 दोन महिने अधिक घ्या : टायपिंगचा स्पीड वाढवा, एप्रिलची परीक्षा जूनमध्ये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / यवतमाळ : निवडणुकीच्या कामाचा प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यामुळे राज्यात एप्रिलमध्ये होणाऱ्या टायपिंग परीक्षा तब्बल दोन महिने लांबविण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जूनमध्ये घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे राज्यातील तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांना सरावासाठी आणखी वाढीव वेळ मिळणार आहे.

ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रातील विद्यार्थ्यांची संगणक टायपिंग परीक्षा १ ते १५ एप्रिलदरम्यान नियोजित होत्या. या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण १ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. परंतु, याचदरम्यान परीक्षा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण विभागातील अन्य अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

कर्मचारी नाहीत : 
परीक्षेकरिता कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले. इतर परीक्षांमुळे लॅब आरक्षित असल्याने परिषदेने टंकलेखन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
१० जूनपासून इंग्रजीच्या तर १८ जूनपासून मराठी, हिंदीच्या संगणक टायपिंग परीक्षा होतील. लघुलेखन परीक्षा जिल्हास्तरावर २० ते २३ जूनदरम्यान होतील, तर मॅन्युअल मशीन टायपिंग परीक्षा ७ व ८ जूनला होणार असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी जाहीर केले आहे.

अर्ज भरण्यासाठीही वेळ : 
दरम्यान, परीक्षेचा लांबविलेला कालावधी लक्षात घेता परिषदेने नियमित व रिपीटर विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अर्ज भरता यावा, यासाठी वाढीव वेळ दिला आहे. त्यानुसार, नोंदणीची लिंक १५ ते २५ एप्रिल या कालावधीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे सरावासाठी वाढीव वेळही मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंद आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos