आता ब्लडसाठी पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारणार : केंद्र सरकारचा निर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : रुग्णालये आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये गरजेच्या वेळेला भरमसाट पैसे मोजून रक्त अक्षरशः खरेदी करावे लागत होते. त्यामुळे अनेकदा रुग्णाचा जीवही जात होता. मात्र आता रक्तावाचून कुणाचाही जीव जाणार नाही.
कारण यापुढे रक्तासाठी केवळ प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रक्त विकण्यासाठी नसते असे सांगत याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे यापुढे गोरगरीबांना रक्तासाठी भरमसाट पैसे मोजावे लागणार नाहीत.
संपूर्ण हिंदुस्थानातील रक्तपेढ्या आणि रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी सीडीएससीओ अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने एक पत्र देशभरातील रुग्णालये तसेच रक्तपेढ्याना पाठवले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रतिनिधींसोबत नुकतीच औषध सल्लागार समितीची बैठक झाली. यामध्ये रक्ताची विक्री होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याचा निर्णय झाला आहे.
दुर्मिळ रक्तगटासाठी दुप्पट फी -
रुग्णालये आणि रक्तपेढ्यामध्ये आतापर्यंत प्रतियुनिट रक्तासाठी दोन ते सहा हजार रुपये वसूल करण्यात येत होते. एखाद्याचा दुर्मिळ रक्तगट असेल तर हे शुल्क दुप्पट होत असे, मात्र आता केवळ २५० ते १ हजार ५५० इतके प्रक्रिया शुल्क किंवा प्रोसेसिंग फी आकारण्यात येईल, असे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
थॅलेसेमियाग्रस्तांना मोठा दिलासा -
गरजूंना तातडीने रक्तपुरवठा व्हावा तसेच गोरगरीबांचा रक्ताविना जीव जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. थॅलेसेमियाग्रस्तांसाठी हा निर्णय एकप्रकारे संजीवनी आहे. या रुग्णांना वर्षात कित्येक वेळा रक्त बदलावे लागते. त्यामुळे त्यांना केवळ प्रक्रिया शुल्क देऊन रक्त मिळवता येईल.
प्लाझ्मा आणि प्लेटलेटसाठी रक्ताच्या एका पिशवीमागे केवळ ४०० रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे.
News - World