महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत वृत्तपत्र विक्रेता दिवस उत्साहात साजरा


- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा उपक्रम; वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना नाश्ता व चहाचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील चामोर्शी रोड पॉइंटवर वृत्तपत्र विक्रेता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला, तर पहाटेपासून वृत्तपत्रांचे वितरण करणाऱ्या मुलांना नाश्ता व चहा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमकर यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच वृत्तपत्र वाटप करणारी मुले उपस्थित होती.

कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे कार्याध्यक्ष संजय आकरे यांनी केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गव्हारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची आठवण -
राजेंद्र गव्हारे म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बालपणी वृत्तपत्र वाटपाचे काम केले होते. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली. त्यांचे जीवन आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीदिनी देशभरात वाचन प्रेरणा दिनही साजरा केला जातो. वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि वृत्तपत्र वितरणाचे महत्त्व यांचा या दिवसाशी जवळचा संबंध असल्याने वृत्तपत्र विक्रेते हा दिवस उत्साहाने साजरा करतात, असे त्यांनी सांगितले.

वृत्तपत्र विक्रेते समाजापर्यंत देश-विदेशातील घडामोडी, सामाजिक प्रश्न आणि महत्त्वाची माहिती पोहोचविण्याचे काम करतात. पहाटेपासून कष्ट घेऊन वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांचे आणि वितरण करणाऱ्या मुलांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

पदाधिकारी व वृत्तपत्र प्रतिनिधींची उपस्थिती -
या कार्यक्रमाला संघटनेचे सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सहसचिव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धिप्रमुख संदीप आकरे उपस्थित होते. तसेच लोकमतचे प्रतिनिधी चौधरी, सकाळचे प्रतिनिधी शेन्डे, नवराष्ट्रचे प्रतिनिधी निलेश टोंगे आणि गडचिरोलीतील लोकमतचे वितरक श्रीकांत पतरंगे यांची उपस्थिती होती.

याशिवाय पुरुषोत्तम रोळे, देवेंद्र बारापात्रे, उमेश सोनटक्के, विक्रम गव्हारे, आकाश वैरागडे, हिराचंद बोबाटे, गिरिधर गव्हारे, रमेश गव्हारे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि वृत्तपत्र वितरण करणारी मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करणे आणि वृत्तपत्र वितरण करणाऱ्या मुलांना नाश्ता व चहा देऊन त्यांच्याप्रती आपुलकी व्यक्त करणे, अशा उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मेहनतीचा गौरव करत आणि वाचनसंस्कृतीचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.





  Print






Related Photos