महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभेत ९ टक्के लाभांशाची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचवटी लॉन येथे रविवारी उत्साहात पार पडली. संस्थेचे माजी अध्यक्ष सय्यद मुजीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश वितरित करण्याची माहिती देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे उद्घाटन उमा सदाशिव तेलंग यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवार, सतीश बावणे, सदानंद उमरे, प्रभाकर काकडे, पुष्पलता दरेकर यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष सदन मुनगेलवार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, संस्थेच्या माध्यमातून सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक तथा संस्थेचे माजी अध्यक्ष जे. डी. पोटे यांच्यासह अल्का चौधरी, दुर्गा खरपकर, देवराव कोडापे, दामोधर किंगरे, गीता हजारे, भाऊराव झाडे, टिकोजबुद्धदास वाळके, चित्रा भोंयर, कल्पना आंबोरकर, संजय डोळस, ललिता उपरकर, शीला चहारे आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच पाच गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

पतसंस्थेच्या उभारणीत सदाशिव तेलंग, जे. डी. पोटे, सय्यद मुजीब, सदानंद उमरे, देशमुख, आसेकर आदींचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पुष्पा आळे यांनी केले, तर प्रवीण नवले यांनी आभार मानले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव अनिल आवळे, संचालक रविंद्र वाककर, प्रमोद उरकुडे, गजानन मरापे, शांताराम कुमरे, पुरुषोत्तम तायडे, श्रद्धा भुसारी (विघ्नेश्वर), राजेश राणे आदींनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos