गडचिरोली जिल्हयात दाखल जंगली हत्तींच्या कळपाला नागरिकांनी त्रास न देण्याचे वन विभागाकडून आवाहन


- नागरिकांनी सेल्फी अथवा पाहण्यासाठी गर्दी करू नये

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  गडचिरोली जिल्हयात धानोरा तालुक्यात छत्तीसगड जंगलातून साधारण १८ ते २२ हत्तींचा कळप दाखल झाला आहे. याबाबत येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. यावरून वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता शांततेने हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यापुर्वीही गेल्या दोन वर्षात दोन वेळा कमी संख्येने हत्ती जिल्हयात दाखल झाले होते. ते काही कालावधीनंतर परत गेले. आता आलेल्या हत्तींची संख्या जास्त असून त्यांना धूडवुन लावण्याची घाई नागरिकांनी करू नये. त्यांना मोठा आवाज, फटाके लावल्याने चिडचिड होते. त्यामूळे ते मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी हत्तीच्या कळपामागे धावू नये, रात्री शेतात हत्ती थांबत असल्याने शेतात रात्री जाणे टाळावे, दिवसा त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण करू नयेत असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.
हत्तींच्या कळपाने मनुष्यावर हल्ले केल्याचे वन विभागाला पाहणीत आढळून आले नाही. मात्र जेव्हा जेव्हा कोणत्याही जंगली प्राण्यांवर आपण हल्ले केले अथवा त्यांच्या वातावरणात व्यत्यय आणला तर ते आक्रमक होवून बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांनी हत्तीला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी हत्तींना धुडकवून लावण्यासाठी तिकडे जावू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

नुकसान झाल्यास वन विभागाकडून पंचनामे

हत्तींच्या कळपामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाने पंचनामे केले आहेत. तसेच इतर ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपल्या शेतातील झालेल्या नुकसानीची माहिती वन विभाग कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांना द्यावी त्यानंतर शेताचे पंचनामे करून संबंधितास नुकसान भरपाई देण्यासाठी प्रक्रिया राबविली जाईल असे वन विभागाने कळविले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-10-21
Related Photos