महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादनावर पोलिसांची कारवाई : २२ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे अवैधरित्या उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्या आरोपींविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली. पोलीस मदत केंद्र गट्टा (फुलबोडी) येथील पथकाने केलेल्या या कारवाईत सुगंधित तंबाखू, त्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य तसेच चारचाकी वाहन असा एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार तसेच अन्य अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांना दिले आहेत. त्यानुसार गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्राच्या पथकाने ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून घराची झडती -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्राच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अजीत जोहन कुजूर (वय २२), रा. जांभळीझोरा, ता. धानोरा, जि. गडचिरोली हा आपल्या राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करीत आहे.

माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष अजीत कुजूर यांच्या घराची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. यावेळी घरामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच तंबाखूच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे विविध साहित्यही पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहनातूनही तंबाखूचा साठा जप्त -
घराची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी परिसरात उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ३३ एसी ५१७०) या वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील सीटखाली दोन पिवळ्या आणि दोन पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमध्ये सुगंधित तंबाखू आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला : १०३ पांढऱ्या रंगाच्या चुंगळ्यांमधील सुगंधित तंबाखू - अंदाजे १२ लाख ५ हजार ३८० रुपये., दोन पांढऱ्या व दोन पिवळ्या रंगाच्या चुंगळ्यांमधील सुगंधित तंबाखू - अंदाजे ३ लाख ५ हजार १०० रुपये., मजा १०८ हुक्का शिसा तंबाखू असे नमूद असलेली १० पॉलीथीन पॅकेट्स - अंदाजे १३ हजार २५० रुपये., तंबाखूच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे बॅक क्लोजर मशीन, ऑटोमॅटिक फिल्म सीलिंग मशीन, पोर्टेबल बॅग शिलाई मशीन व स्ट्रेटनर मशीन - अंदाजे १ लाख २५ हजार ५०० रुपये., महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ३३ एसी ५१७० - अंदाजे ६ लाख रुपये., अशाप्रकारे पोलिसांनी एकूण २२ लाख ५० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल -
पोलिसांनी अजीत कुजूर याच्याकडे केलेल्या चौकशीत या प्रकरणातील अन्य आरोपींची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार प्रशांत याडवार, रा. गडचिरोली हा या प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे समोर आले. तसेच साईनाथ टाटाजी कन्नाके (वय ३९), सचिन ज्ञानेश्वर कन्नाके (वय ३२), दोघेही रा. ढोरप, ता. पवनी, जि. भंडारा, आणि अभिजित यादव नान्हे, रा. उमरेड, जि. नागपूर हे त्याचे साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून गट्टा (फु.) पोलीस मदत केंद्रात अपराध क्रमांक ५४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता-२०२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ मधील संबंधित कलमांनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार आरोपींना अटक; फरार आरोपीचा शोध सुरू -
या प्रकरणातील अजीत जोहन कुजूर, साईनाथ टाटाजी कन्नाके, सचिन ज्ञानेश्वर कन्नाके आणि अभिजित यादव नान्हे या चार आरोपींना २० सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. तर फरार आरोपी प्रशांत याडवार याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) हे करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी., तसेच सहायक पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.)चे पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे आणि पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.





  Print






Related Photos