पोलीस भरतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्याची संधी द्या : युवक-युवतींचे धरणे आंदोलन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : एका जिल्ह्यातील उमेदवार हा केवळ एकाच जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतो, अशी जाचक अट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अटीमुळे राज्यातील हजारो पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे उमेदवाराला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी एकाचवेळी अर्ज करता यायला हवा. या मागणीसाठी आज संविधान चौकात शेकडो युवक-युवतींनी आंदोलन केले. उमेदवारांनी आज राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली.
नागपूर जिल्हा आणि शहरातील विविध भागातून युवक संविधान चौकात जमले होते. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधी निदर्शने केली. राज्यात पोलीस विभागात १८००० पोलीस जागा भरण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी युवक-युवती तयारी करीत होते. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता. परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही. त्यामुळे उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कार्यालयात निवेदन दिले आहे.
News - Nagpur