भंडारा जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ भंडारा : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
हा आदेश २८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात लागू राहणार आहे.या कालावधीत विविध धार्मिक सण-उत्सव, मिरवणुका तसेच सामाजिक व राजकीय कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
२९ सप्टेंबर रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी व गणपती स्थापना, ८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुका, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम तसेच १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक स्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मनाई आदेशाच्या कालावधीत मिरवणुका किंवा इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष परवानगी देण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील नागरिकांनी सण-उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




