छत्तीसगडमध्ये महिला नक्षलीचा खात्मा


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगडमधील कवर्धा येथील सुरतिया गावाजवळ  पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज २९ सप्टेंबर रोजी चकमक झाली. या चकमकीत जुगनी या नक्षलवादी महिलेचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.  नक्षलवाद्यांचे मोठ्याप्रमाणावर साहित्य देखील जप्त करण्यात  आले आहे.
सुरतिया गावाजवळ नक्षली सक्रीय असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी या परिसराला वेढा दिला होता. त्यानंतर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार सुरू करण्यात आला व चकमकीस सुरूवात झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात महिला नक्षली जुगनी हिचा खात्मा करण्यात आला.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर दंतेवाडा जिल्ह्यात दोन आणि बीजापुरमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.   Print


News - World | Posted : 2019-09-29


Related Photos