१ ऑक्टोबरपासून पर्यटकांना करता येणार ताडोबा ची सफर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
 पावसाळी सुट्टी संपत असून १ ऑक्टोबरपासून पर्यटकांना ताडोब्याची सफर करता येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये पर्यटकांसाठी मान्सून सफारी १ जुलैपासून बंद करण्यात आली होती. आता   सर्व दरवाजे उघडण्यात येणार आहेत.  
 जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात या संरक्षित जंगलामध्ये भ्रमंती करणे कठीण असते. ताडोबा पावसाळ्याच्या कालावधीत अंशतः सुरू राहत असे. पण, मागील दोन वर्षांपासून ताडोबा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. यंदाही कोअर झोन पूर्णपणे बंद तर बफरचे सात दरवाजे सुरू होते. त्याचे ऑनलाइन बुकींगदेखील सुरू होते.
राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोब्यात आहे. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती व्याघ्र पर्यटनात ताडोब्यालाच असते. यंदा मान्सून पर्यटनाला संपूर्ण मोसमात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. आगरझरी व देवाडा या गेटला पर्यटकांवर पर्यटकांची गर्दीही झाली. पण, बऱ्याच वेळा पावसाने व्यत्यय आणल्याने या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद या मोसमात घेता आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भासोबत राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पही मंगळवारपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-28


Related Photos