महत्वाच्या बातम्या

 अपघात मुक्त नागपूर जिल्हा ही संकल्पना राबवूया : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- जिल्हा सुरक्षा समितीची बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : दळण- वळण व सक्षम वाहतुकीसाठी आपल्या जिल्ह्याला भक्कम पायाभूत सुविधा शासनाने दिल्या आहेत. यात जी काही अपघात प्रवण स्थळे आहेत. तिथे उपाययोजना करुन अपघात मुक्त नागपूर जिल्हा ही संकल्पना जनजागृतीतून प्रभावीपणे राबवूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल रस्ते सुरक्षाविषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, महामार्ग पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अपघाताला अनेक कारणे जबाबदार आहे. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग, गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे, गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान, चालकांवरील अतिताण, थकवा तसेच रस्त्यात कुठेही गाडी उभी करणे या कारणांमुळे बहुतेक अपघात होतात. त्याचबरोबर धुके किंवा मुसळधार पाऊस, प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे, जनावर रस्त्यात आडवे येणे, पादचाऱ्यांची चूक, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी यामुळेही अपघात घडत असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

अपघात टाळण्यासाठी नेहमी सीट बेल्ट वापरण्यात कमीपणा मानू नका, लेनची शिस्त नेहमी पाळा, आखून दिलेली वेगमर्यादा पाळा, महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा, गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा, रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा व सर्वात महत्वाचे वाहतूक नियम पाळा. धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॅाट ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्हा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठकीत दिले.





  Print






News - Nagpur




Related Photos