देशात पहिल्यांदाच नागीण विकारावर लस : जीएसकेची लस देणार १० वर्षे संरक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच नागीण या विकारावर ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडची (जीएसके) शिंग्रिक्स ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस नागीण विकारानंतर मज्जातंतूला होणाऱ्या वेदना थांबवते आणि पुढील १० वर्षे नागीणपासून संरक्षणही करते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
देशात ५० वर्षांवरील प्रौढांना तसेच मधुमेह, हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्यांना प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे नागीण होण्याचा धोका अधिक असतो. ५० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये नागीण झाल्यानंतर होणाऱ्या वेदनांचा धोका ३० टक्के अधिक असतो आणि वेदनाही अधिक त्रासदायक असतात. यावर जीएसकेची शिंग्रिक्स ही जगातील पहिली नॉन-लाइव्ह, पुनर्संयोजित सबयुनिट लस असून, तिचे दोन डोस स्नायूमध्ये दिले जातात. व्हॅरिसेला झोस्टर विषाणू (व्हीझेडव्ही) पुन्हा सक्रिय झाल्यामुळे (रिऑक्टिव्हेशन) शिंगल्स (नागीण) हा आजार होतो. याच विषाणूमुळे कांजिण्या (चिकनपॉक्स) होतात. दरम्यान, नागीणवर लसीकरण हाच एकमेव प्रतिबंधाचा पर्याय आहे, अशी माहिती ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक भूषण अक्षीकर यांनी दिली.
News - Rajy