चंद्रपुरात राहत्या घरातून गांजाची विक्री : ६९ वर्षीय वृद्धाला अटक

- शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई; भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ सापळा रचून गांजासदृश पदार्थ जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात स्वतःच्या राहत्या घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी) कारवाई करत ६९ वर्षीय वृद्धाला अटक केली. पांडुरंग गंगाधर बानलवार ६९ वर्षे रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ करण्यात आली. या कारवाईत एका प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आलेला गांजासदृश अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा -
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक परिसरात गस्त घालत असताना भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ राहणारा पांडुरंग बानलवार हा स्वतःच्या घरात गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस निरीक्षक कृणाल रामटेके यांना मिळाली.
माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका प्लास्टिकच्या पिशवीत वाळलेली पाने, फुले, देठ आणि बिया असलेला गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला.
मुद्देमाल जप्त; आरोपीला अटक -
पोलिसांनी आढळून आलेला गांजासदृश पदार्थ जप्त करून पांडुरंग गंगाधर बानलवार याला अटक केली. राहत्या घरातूनच अमली पदार्थाची साठवणूक आणि विक्री केली जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या पदार्थाचे प्रमाण आणि त्यासंदर्भातील पुढील तपासाबाबत अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
शहर पोलिसांच्या पथकाची कारवाई -
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, कपिल घुगे आणि डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
चंद्रपूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध साठवणुकीविरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




Petrol Price




