वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड


- दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शासनामार्फत अनुदान तत्त्वावर वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येत आहे. या वर्षात एलनिनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षित सिंचनाचा मुख्य स्रोत असलेल्या शेततळे घटकावर विशेष भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महा-डीबीटी पोर्टलवर वैयक्तिक शेततळे घटकासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के अर्जांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात एकूण ५७ हजार १७४ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ हजार ९२५, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ हजार ३७९ तर इतर प्रवर्गातील ७७ हजार ८७० शेतकऱ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संदेश प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत हमीपत्र (परिशिष्ट २) आणि आवश्यकतेनुसार जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र महा-डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास संबंधित शेतकऱ्यांची निवड रद्द केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर व पूर्वसंमती मिळाल्यावर सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून विहित वेळेत शेततळ्याचे काम पूर्ण करणारे शेतकरीच अनुदानास पात्र राहतील. या प्रक्रियेतील पुढील टप्प्यांची माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मोबाईल संदेश आणि पोर्टलद्वारे दिली जाणार आहे. योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.




Petrol Price




