महत्वाच्या बातम्या

 पोलीस कारवाईच्या भीतीपोटी आदिवासी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्रेयसीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल होऊन पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी आदिवासी युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल बुधवारी उघडकीस आली. धनराज चरण तुमडाम (३५, पेंडरई) असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, पोलिसांच्या दबावामुळे युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत नागरिकांनी देवलापार पोलीस ठाण्याला घेराव घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

देवलापार पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंडरई गावात धनराज तुमडाम हा युवक पत्नी व दोन मुलांसह राहायचा. त्याची एका २२ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. धनराजने तिला लग्नाचे आमिष दाखवले. चार वर्षे प्रेमसंबंध ठेवत तरुणीकडून ३० हजार रुपये घेतले. परंतु, धनराज विवाहित असल्याचे तरुणीला कळले. तिने पैसे परत मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने देवलापार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घोडके हे दोन कर्मचाऱ्यांसह धनराजच्या घरी गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. सामाजिक कार्यकर्ते रमेश कारामोरे आणि जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांच्या नेतृत्वात ३० ते ४० जणांनी देवलापार पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांच्या दबावामुळेच धनराजने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.

तरुणीने धनराजला ४० हजारांची मागणी केली व पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या भीतीमुळे धनराजने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांनी दबाव टाकला का, याबाबतही चौकशी सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos