पाटेकुर्रा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार


- भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला; मृतदेहाजवळच वाघ आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील पाटेकुर्रा पहाडी जंगल परिसरात भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेलेल्या ७३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. वातू बकाराम राऊत ७३ वर्ष, रा. झुरकुटोला असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे झुरकुटोला व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वातू राऊत हे मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास पाटेकुर्रा पहाडी जंगल परिसरात भंभोडी (सात्या) आणण्यासाठी गेले होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
वातू राऊत यांचा दिव्यांग मुलगा वडील घरी परतले नसल्याने चिंतेत पडला. त्याने शेजारील दोन व्यक्तींना जंगल परिसरात वडिलांचा शोध घेण्यासाठी पाठविले. शोध घेत असताना या दोघांना जंगलात वातू राऊत यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, मृतदेहापासून काही अंतरावर वाघ बसलेला असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.
मृतदेहाजवळ वाघ दिसताच शोध घेणारे दोघे गावाकडे परतले -
मृतदेहाजवळच वाघ आढळल्याने दोन्ही व्यक्ती घाबरल्या आणि त्यांनी तातडीने घटनास्थळावरून माघार घेतली. त्यांनी गावात पोहोचून या घटनेची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी वन विभाग तसेच डुग्गीपार पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप यादव, क्षेत्र सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी मूलचंद नंदेश्वर, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर क्षेत्र) मिथुन तरोणे, क्षेत्र सहाय्यक दिगंबर बुरेले, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नवनाथ मुंडकर, वनरक्षक ज्ञानोबा कोटगीर, अतुल घोडेस्वार, आकाश राऊत, वैशाली मेहर आणि मुकेश चव्हाण यांचा समावेश होता. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर हल्ला करणाऱ्या वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने शोधमोहीम सुरू केली आहे.
कुटुंबीयांना तातडीने १० हजारांचे सानुग्रह अनुदान -
वाघाच्या हल्ल्यात वातू राऊत यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना वन विकास महामंडळाच्या माध्यमातून तातडीने १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. वन विकास महामंडळाच्या राखीव जंगल परिसरात ही घटना घडल्याने शासनाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्लेखोर वाघाचा शोध सुरू -
पाटेकुर्रा पहाडी जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. वातू राऊत यांच्यावर हल्ला केल्यानंतरही वाघ घटनास्थळाजवळच असल्याचे शोध घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दिसून आले. याशिवाय, या परिसरातील आणखी दोन गावकऱ्यांनाही वाघाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे.
वन विभागाच्या पथकाकडून हल्लेखोर वाघाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाटेकुर्रा व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये विशेषतः चिंता वाढली आहे.
पहाटे व सायंकाळी एकट्याने जंगलात जाऊ नये -
वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जांभळी-दोडके परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. परिसरातील नागरिकांनी पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी एकट्याने जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




Petrol Price




