महत्वाच्या बातम्या

 वर्धा येथे तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सव


-  9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आयोजन
-  गायक कैलास खेर यांचा गितांचा कार्यक्रम
-  प्रमुख अधिकाऱ्यांच्या समित्या गठित
-  महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील संस्कृतीचे आदान प्रदान होण्यासाठी वर्धा येथे तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान लोक महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सोपविलेली कामे संबंधितांनी उत्तमपणे पार पाडावे, अशा सूचना आमदार डॉ.पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संयुक्तपणे केल्या.

महासंस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आ.डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मोकलकर, उप अभियंता आचार्य यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सवामध्ये घ्यावयाचे कार्यक्रम व उपक्रमाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहतील यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

या महोत्सवातील कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीला नेमून देण्यात आलेली कामे सुरळीत पार पाडण्याचे निर्देश आ.डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिले.

9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ढोल ताशापथक, मल्लखांब, दांडपट्टा प्रात्याक्षिक, महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेली गिते, लावणी, पोवाडे, गोंधळ यांचा कार्यक्रम तसेच बचत गटामार्फत साहित्य प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा, स्थानिक कलाकारांचे लोकनृत्य, नाट्य, गायन इत्यादी तसेच बचत गटामार्फत उत्पादित साहित्यांची विक्री तर 11 फेब्रुवारी रोजी सुप्रसिध्द पार्श्वगायक कैलास खेर यांचा बहारदार गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व तीन दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos