महत्वाच्या बातम्या

 रुग्णालयाची विश्वासार्हता वाढवा, दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी मनापासून काम करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर


- आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आरोग्यमंत्र्यांची ग्रामीण रुग्णालय सेलू व प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंगणीला भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : रुग्णांना समाधानकारक व दर्जेदार उपचार मिळाले तर रुग्ण खाजगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याला प्राधान्य देतील. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून समर्पित भावनेने काम करावे. यामुळे रुग्णालयाची विश्वासार्हता देखील वाढेल. रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करून कामकाजाचा विस्तार करावा, अशा सुचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य संवाद यात्रेदरम्यान सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण रुग्णालय सेलू व प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंगणी येथे भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य संचालक डॉ.विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, सेलू ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.पल्लवी खेडीकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार करण्यावर भर देऊन ग्रामीण भागातील रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील महिलांच्या प्रसुती स्थानिक स्तरावर होईल यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्यात. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान श्री.आबिटकर यांनी सेलू रुग्णालयातील आरोग्यसेवा, उपलब्ध सुविधा व कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशीसंवाद साधला.

भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया वाढवून उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग रुग्णालयात सुविधा वाढवण्यावर करावा, असे सांगितले तसेच आंतररुग्ण व बाह्यरुग्ण संख्या व त्यांना मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती घेतली. रुग्णालयात होणाऱ्या प्रसूती व रेफर याबाबत विचारणा केली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्यसेवा, उपचारांची गुणवत्ता व सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. रुग्णांना वेळेवर व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय सेलू येथे १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता या मागणीबाबत गावकऱ्यांनी आपली भूमिका मांडली. आरबीएसके कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या बालकांच्या भेट घेत पालकांनी संवाद साधला.

हिंगणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट -
हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त व सुसज्ज इमारत, स्वच्छ व नीटनेटके परिसर तसेच आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (OT) पाहून आरोग्यमंत्री आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण नागरिकांना स्थानिक स्तरावरच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या सुविधांच्या त्यांनी दखल घेतली. हिंगणी प्राथमिक आरोग्य केंद्राने उपलब्ध सुविधांच्या आधारे आरोग्यसेवांचा व्याप वाढवावा, असेही त्यांनी सूचित केले.





  Print






Related Photos