मुदत संपूनही मंजुरीविना कोट्यवधींची कामे सुरूच : पप्पू देशमुखांचा मनपा प्रशासनाला जाब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिकेच्या अमृत २.० अभियानांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा मुद्दा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी उपस्थित केला आहे. कामांची निर्धारित मुदत संपूनही आवश्यक प्रशासकीय व शासनस्तरीय मंजुरी न घेता कंत्राटदारांकडून कामे सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांसह जबाबदार महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महापौर संगीता खांडेकर यांनी सभागृहात दिले.
केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर शहरात ३० कोटी रुपयांचे रामाळा तलाव पुनर्जीवन, २७०.१३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणि ५४२.०५ कोटी रुपयांची मलनिस्सारण योजना अशी तीन मोठी विकासकामे सुरू आहेत. मात्र, या तिन्ही कामांची निर्धारित मुदत संपूनही कामे अद्याप अपूर्ण आहेत. विशेष म्हणजे, मुदतवाढीची अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच कामे सुरू ठेवण्यात आल्याचा आक्षेप पप्पू देशमुख यांनी घेतला. रामाळा तलाव पुनर्जीवन प्रकल्पाचे कंत्राटदार रोहित भोंगळे यांना १९ ऑगस्ट २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला होता. दीड वर्षांची कामाची मुदत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली. मात्र, मुदतीपर्यंत या प्रकल्पाचे केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले. त्याचप्रमाणे, अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम मेसर्स लक्ष्मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि., कोल्हापूर यांना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी देण्यात आले होते. या कामाची मुदत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली असून, आतापर्यंत केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
तर मलनिस्सारण योजनेचे काम मेसर्स ईगल इन्फ्रा इंडिया लि., उल्हासनगर यांना ११ मार्च २०२४ रोजी देण्यात आले होते. या कामाची निर्धारित मुदत १० मार्च २०२६ रोजी संपली. मात्र, या कालावधीत केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती देशमुख यांनी सभागृहात मांडली. तीनही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची मुदत संपल्यानंतरही कामे अपूर्ण असताना, मुदतवाढीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय आणि शासनस्तरीय अंतिम मंजुरी न घेताच कामे सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदारांना अभय मिळत असून, सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कोट्यवधींच्या विकासकामांमध्ये जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांसह जबाबदार मनपा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे अमृत अभियानातील या तीन मोठ्या प्रकल्पांच्या कामकाजावरून महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापौरांनी दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर पुढील कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




