किटाडी जंगलात वाघाचा हल्ला : चार पाळीव जनावरांचा मृत्यू


- नऊ महिन्यांची गर्भवती गाय, दोन गोहे आणि एका गोन्हीचा समावेश; पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / लाखनी : लाखनी तालुक्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाने चार पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना जागीच ठार केल्याची घटना शनिवारी १० ऑक्टोबर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. लाखनी वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) अंतर्गत येणाऱ्या किटाडी जंगल बीटमधील कक्ष क्रमांक ३८९ येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किटाडी शिवारात मागील दोन ते अडीच वर्षांपासून पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे सांगण्यात येते. या परिसरात वाघाने यापूर्वीही अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता एकाच वेळी चार जनावरांचा बळी गेल्याने पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
चराईसाठी जंगलात नेलेल्या जनावरांवर वाघाची झडप -
किटाडी येथील शेतकरी अमरपाल ठवरे यांच्या मालकीची ही चारही जनावरे होती. शनिवारी ते आपल्या घरची एकूण नऊ जनावरे जंगलात चराईसाठी घेऊन गेले होते. जनावरे जंगल परिसरात चरत असताना दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. मृत जनावरांमध्ये नऊ महिन्यांची गर्भवती संकरित गाय, दोन गोहे आणि एका गोन्हीचा समावेश आहे. या घटनेत शेतकरी अमरपाल ठवरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाघाचा प्रतिकार करण्यासाठी धावले झाडाचा घेतला आसरा -
आपल्या जनावरांवर वाघाने हल्ला केल्याचे लक्षात येताच अमरपाल ठवरे यांनी हातात काठी घेऊन वाघाला प्रतिकार करण्यासाठी धाव घेतली. मात्र, वाघ त्यांच्या अंगावर चवताळून आल्याने त्यांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगावधान राखत जवळच्या झाडाचा आसरा घ्यावा लागला.
यानंतर त्यांनी मोबाइलवरून घडलेल्या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना दिली. वाघाच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने जंगलात जनावरे चराईसाठी नेणाऱ्या पशुपालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वाघाच्या वावरामुळे पशुपालकांमध्ये दहशत -
किटाडी परिसरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वाघाचा वावर असल्याने स्थानिक नागरिक आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जनावरे जंगलात चराईसाठी नेणेही धोकादायक ठरत असल्याने पशुपालकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने किटाडी परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच, पशुपालकांना सतर्कतेच्या सूचना देऊन पाळीव जनावरांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.




Petrol Price




