महत्वाच्या बातम्या

 पीक विविधीकरणातून तेलबिया व कडधान्य लागवडीकडे वळा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


- राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न; तेलबिया उत्पादन, उत्पादकता वाढीसह प्रक्रिया उद्योगावर भर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, बदलते हवामान, पाण्याची उपलब्धता आणि शेतीसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक विविधीकरणावर भर देणे आवश्यक आहे. पारंपरिक भातशेतीसोबत तेलबिया व कडधान्य पिकांची लागवड करून शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न करावा. तसेच पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील अनिश्चितता विचारात घेऊन हवामानानुकूल शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत १३ ऑक्टोबर रोजी आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तेलबिया पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे, तसेच पेरणीपासून काढणीपश्चात व्यवस्थापनापर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

रब्बी हंगामात तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन -
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रास्ताविकातून रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी करडई, तीळ, जवस, मोहरी आणि भुईमूग यांसारख्या तेलबिया पिकांच्या लागवडीकडे वळावे. यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य पीक निवड, सुधारित लागवड तंत्रज्ञान, जमिनीची सुपीकता, पाण्याचे नियोजन आणि पिकांचे योग्य व्यवस्थापन या बाबींना महत्त्व देण्याची गरज कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आली.

शून्य मशागत पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन -
कार्यशाळेत जितेंद्र गभने यांनी तेलबिया पिकांची लागवड आणि शून्य मशागत पद्धतीने मोहरीची पेरणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कमी खर्चात शेती करण्यासाठी आधुनिक लागवड पद्धतींचा वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी माहिती दिली. दिभणा येथील विलास जेंगठे यांनी तेलबिया पिकांचे महत्त्व आणि जवसाच्या विविध उपयोगांविषयी मार्गदर्शन केले. तेलबिया पिकांची लागवड केवळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता त्यांचा आहार, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील मागणीशी असलेला संबंध लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुरखेडा तालुक्यातील चिचेवाडा येथील अजय मडावी यांनी जैविक व नैसर्गिक शेतीतील अनुभव मांडले. अहेरी तालुक्यातील महागाव येथील विठोबाजी बोरीले यांनी तीळ आणि भाजीपाला लागवडीतील प्रत्यक्ष अनुभव सांगत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तेलबिया प्रक्रिया उद्योगातून उत्पन्नवाढीची संधी -
शंकरपूर येथील शिवकृपा ऑईल मिलचे संचालक तिलक करकाडे यांनी तेलबिया प्रक्रिया, पूरक व्यवसाय म्हणून तेलगिरणी उभारण्याच्या संधी आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळविण्याच्या उपायांबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तेलबियांची थेट विक्री करण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारल्याने शेतीपूरक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते, या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले.

धान पिकाची काळजी आणि उत्पादकता वाढीवर भर -
कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी सध्याच्या परिस्थितीत धान पिकाची घ्यावयाची काळजी, तेलबिया पिकांच्या लागवडीदरम्यान आवश्यक खबरदारी आणि उत्पादकता वाढविण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. हवामानातील बदलांचा विचार करून पीक व्यवस्थापन करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यक उपाययोजना राबविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी, कृषी सखी आणि उत्पादक कंपन्यांचा सहभाग -
या जिल्हास्तरीय कार्यशाळेला शेतकरी, कृषी सखी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, शेतकरी गटांचे सदस्य तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या माध्यमातून तेलबिया पिकांचे महत्त्व, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ व्यवस्थापन याविषयी सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पीक विविधीकरण, तेलबिया लागवड आणि कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.






  Print






Related Photos