सेवा संकल्प अभियानांतर्गत ७४ युवक-युवतींना शासकीय योजनांचे मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा आणि तुमसर येथे युवक-युवतींसाठी शासकीय योजनांची जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांचा एकूण ७४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लाभ घेतला.
राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेशी संबंधित विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत ८ ऑक्टोबर रोजी सेंदुरवाफा (ता. साकोली) येथील गजानन महाराज मंदिर हॉल, पॉलिटेक्निक कॉलेज रोड तसेच तुमसर येथील तहसील कार्यालयात मार्गदर्शन स्टॉल उभारण्यात आले.सेंदुरवाफा येथील कार्यक्रमात कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आशालता वालदे आणि लिपिक टंकलेखक अमित मलोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर तुमसर येथील स्टॉलवर लिपिक टंकलेखक चेतन बागडे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) जिल्हा समन्वयक अतुल पडोले यांनी उपस्थितांना विविध योजनांची माहिती दिली.यावेळी सेवायोजन वेबपोर्टलवर नावनोंदणी, रोजगार मेळावे, अल्पमुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर ग्रंथालयासारख्या अभ्यासिका सुविधा तसेच उद्योजकतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व इनक्युबेशन सेंटर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ घेऊन युवक-युवतींनी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधींचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथील सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले. सेंदुरवाफा येथे ५७, तर तुमसर येथे १७ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. अशा प्रकारे एकूण ७४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.




Petrol Price




