घरी जायला उशीर झाला अन् ११ वर्षीय बालक पोहोचला रेल्वे स्थानकावर : चाईल्ड लाईनमुळे पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मित्रासोबत खेळण्यात वेळ गेला, घरी जायला उशीर झाला आणि घरी परतण्याऐवजी ११ वर्षीय बालकाने थेट रेल्वे स्थानक गाठले. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने प्रवास करत तो बल्लारशाह स्थानकावर पोहोचला. मात्र, घरापासून दूर असलेल्या या चिमुकल्याला वेळीच मदतीचा हात मिळाला. रेल्वे चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे त्याची ओळख पटली आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत पोहोचविण्यात आले. २७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत रेल्वे चाईल्ड लाईनच्या तत्परतेमुळे बालकाला सुरक्षितपणे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यश आले.
रेल्वे चाईल्ड लाईनचे केस वर्कर विजय अमर्थराज हे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर संपर्क व जनजागृतीचे काम करीत असताना फलाट क्रमांक ४ वर एक बालक पालकांशिवाय आढळून आला. बालकाची अवस्था लक्षात घेऊन त्यांनी त्याच्याशी संवाद साधला आणि त्याची विचारपूस केली. त्यावेळी बालकाने सांगितले की, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी मित्राकडे अभ्यास पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. मित्रासोबत खेळल्यानंतर घरी जाण्यास उशीर झाला. त्यामुळे घरी परतण्याऐवजी त्याने चंद्रपूर रेल्वे स्थानक गाठले आणि रेल्वेने प्रवास करून सकाळी बल्लारशाह येथे उतरला.
अनोळखी रेल्वे स्थानकावर पालकांपासून दूर असलेल्या या बालकाला मदतीची गरज असल्याचे ओळखून चाईल्ड लाईनच्या पथकाने त्याची माहिती मिळविण्यास सुरुवात केली. बालकाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये चार पुस्तके आढळली. त्यापैकी एका पुस्तकात लिहिलेल्या दूरध्वनी क्रमांकामुळे बालकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने बालक हरविल्याची माहिती दिली. तसेच बालकाचे काका रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचेही समोर आले.
दरम्यान, रामनगर पोलिसांनी बल्लारशाह रेल्वे चाईल्ड लाईनशी संपर्क साधून बालकाबाबत माहिती घेतली. बालक बेपत्ता झाल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पथक बल्लारशाह रेल्वे चाईल्ड लाईन येथे पोहोचले आणि बालकाबाबत आवश्यक चौकशी केली.
पुढील कार्यवाहीसाठी बालकाला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे मुस्कान नोंद करण्यात आली तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणाची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा समन्वयक अभिषेक मोहुर्ले, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. क्षमा बासरकर आणि सदस्य डॉ. ज्योत्सना मोहितकर व वनिता घुमे यांना देण्यात आली.
त्यानंतर बालक आणि त्याच्या पालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तसेच बालक हरविल्याबाबतच्या प्रथम माहिती अहवालाची प्रत समितीसमोर सादर करण्यात आली. बालकाचे समुपदेशन करताना आई-वडिलांना न सांगता घराबाहेर पडू नये, पुन्हा अशा प्रकारे घर सोडून जाऊ नये आणि शिक्षणाकडे लक्ष देऊन चांगले भविष्य घडवावे, याबाबत त्याला मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांच्या काळजी व संरक्षणासंदर्भात कोणतीही अडचण उद्भवल्यास १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि समुपदेशनानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. घरापासून दूर गेलेल्या बालकाला सुरक्षितपणे कुटुंबात परत आणण्यात आल्याने या कार्यवाहीला यश आले.
या कार्यवाहीदरम्यान लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पंकज भांगे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रेल्वे चाईल्ड लाईनचे पर्यवेक्षक भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, विजय अमर्थराज, सुरेंद्र धोडरे आणि धर्मेंद्र मेश्राम यांनी बालकाला सुरक्षितपणे पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.




Petrol Price




