२१ ते २५ डिसेंबर दरम्यान गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कृषी व गोंडवन महोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत गडचिरोली येथील मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध विभागांचे ३०० स्टॉल राहतील, अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी दिली आहे.
२१ डिसेंबर रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते राहतील. मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, कृषी सभापती नाना नाकाडे, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आत्माचे संचालक अनिल बन्सोडे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित राहतील.
२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर चर्चासत्र व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील. प्रदर्शनात विविध पिकांचे प्रात्यक्षिके, सेंद्रीय शेती मालाची विक्री, कृषीपुरक उद्योग माहिती व तंत्रज्ञान, क्रेता-विक्रेता खरेदी विक्री मेळावा, कृषी उपयोगी विविध अवजारांची प्रदर्शनी, विविध प्रजातींचे पशु व दुग्ध उत्पादन विषयावर कार्यशाळा, मत्स्यपालन प्रदर्शन, रेशीम कीटक संगोपण आदींचे स्टॉल राहतील.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ४५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी मागील वर्षीच्या प्रदर्शनाला ९ हजार ५० शेतकऱ्यांनी भेट दिली. यावर्षी किमान १५ हजार शेतकरी भेट देतील, अशी अपेक्षा डॉ. पवार यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला डीआरडीएचे प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे, जयंत टेंभुर्णे, दीपक सोरते, ए. बी. पंधरे आदी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos