औरंगाबाद मध्ये चोरट्यांनी पळविली एटीएम मशीन


वृत्तसंस्था / औरंगाबाद :  येथील  बीड बायपास मार्गावरील गुरूदत्त मंदिरासमोरील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधून चोरटयांनी चक्क एटीएम मशीनच चोरून नेली. ही मशीन स्कॉर्पिओ कारमधून चोरून नेण्यात आल्याचे आसपासच्या सीसीटिव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. या एटीएममध्ये २५ लाख रूपयांची कॅश असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. ही घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूदत्त मंदिरासमोर असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये कॅनरा बँकेचे आणि एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. एसबीआय बँकेच्या सेंटरमध्ये दोन एटीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. रात्री एक वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी थांबली. ही गाडी थांबल्यानंतर चोरट्यांनी ही एटीएम मशीन उचलून कारमध्ये लादली. एटीएम मशीन कारमध्ये टाकून या चोरटयांनी पोबारा केला. काच फुटण्याचा आवाज झाल्याने इमारतीमधील काही जण खाली आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 
या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांसह, गुन्हे शाखेचे पोलिसही घटना स्थळी दाखल झाले होते. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून एटीएम मशीन चोरून नेत असल्याचे दिसले. पोलिसांनी रात्री अधिक तपास केला असता, ही संशयित कार शहराच्या पूर्वेच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, या एटीएममध्ये २५ लाख रूपयांची कॅश असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. 
एटीएम सेंटरमधून चोरण्यात आलेल्या सदर मशीनला फक्त वीज सप्लाय आणि इंटरनेट कनेक्शनचे वायर लावलेले होते. एटीएम मशीन उचलून घेऊन जाऊ नये यासाठी या मशीन जमिनीला किंवा भिंतीला नट बोल्टच्या सहाय्याने फिक्स करण्यात येतात. मात्र ही मशीन एकच वायरवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.   Print


News - Rajy | Posted : 2019-07-13


Related Photos