बहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतात काम करीत असताना बहिणीच्या डोक्यात धारदार भाला मारून खून करणाऱ्या भावाला गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच आरोपीस १ हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.
रममेश व्यंकटी जनगाम असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सिरोंचा तालुक्यातील नडीकुडा येथील फिर्यादी समय्या किष्टय्या याने १ आॅगस्ट २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची पत्नी मृतक बालका समय्या बोरमपल्ली ही गावातील मजूर महाकाली मलय्या कावेरी हिच्यासोबत शेतात काम करण्यासाठी गेली होती. यावेळी समय्या बोरमपल्ली हा शेतात डवरणीचे काम करीत होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शेतात ओरडण्याचा आवाज आला. त्याने पाहिले असता बालका हिचा भाउ रमेश व्यंकटी जनगाम हा बालका हिला मारहाण करीत होता. यावेळी समय्या ओरडत धावत सुटला. यावेळी आरोपी रमेश जनगाम आणि बापू व्यंकटी जनगाम हे शेतातून पळताना दिसले. समय्या ने बालका जवळ जावून बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोक्यात लोखंडी धारदार भाला फसून असल्याचे दिसले. सदर घटनेची महाकाली मलय्या कावेरी ही प्रत्यक्षदर्शी असल्याने रमेश व्यंकटी जनगाम याने मृतक बहिणीच्या डोक्यावर वार करून जिवानिशी ठार केल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपी रमेश जनगाम याला ३ आॅगस्ट २०१५ रोजी अटक करण्यात आली तर आरोपी बापू जनगाम हा घटनेपासून फरार झाला आहे.
प्रकरणात न्यायाधिश संजय जी. मेहरे यांनी साक्षपुरावा तपासून आरोपी रमेश जनगाम याला कलम ३०२ भादंवी अन्वये काल १४ सप्टेंबर रोजी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास असरअल्ली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-15


Related Photos