राज्यात आरटीई प्रवेशात गोंदिया प्रथम : ७०.४९ टक्के प्रवेश निश्चित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली असून, त्यात गोंदिया जिल्ह्यातील ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. टक्केवारीनुसार बघितल्यास ७०.४९ टक्केवारी होत असून, यामुळे प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर दिसत आहे. ९ मे रोजीचा हा अहवाल असून, आरटीईअंतर्गत यंदा जिल्ह्यातील ८६४ जागांसाठी तब्बल ३ हजार ९५९ अर्ज आले होते. त्यातील ८६३ पालकांना एसएमएस गेला आहे.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ जागा आरक्षित असून, त्यासाठी ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज आले होते. आरटीईअंतर्गत लॉटरी निघाली असून, राज्यातील ९४ हजार ७०० पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. यंदा जिल्ह्यातील १३१ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली. त्यात ८६४ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३ हजार ९५९ अर्ज आले होते. यातील ८६३ पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.
ज्या पालकांना एसएमएस मिळाले आहेत, त्यांना लगेच कागदपत्रांची पडताळणी करून आपल्या पाल्याचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. अहवालानुसार, राज्यातील एकूण ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
News - Gondia