विद्यार्थी जीवनामध्ये क्रीडा स्पर्धांचे महत्त्व : आमदार सुधाकर अडबाले
- आमदार चषक : राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा (मुली) थाटात उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विद्यार्थी जीवनामध्ये क्रीडा स्पर्धांना अत्यंत महत्त्व आहे. शालेय जीवनातच क्रीडा स्पर्धांची आवड निर्माण झाल्यास भविष्यात उत्कृष्ट खेळाडू तयार होतील आणि ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च एज्युुकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा स्टेडीयमच्या बाजूला चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित हॉकी स्पर्धा (मुली) उद्घाटन ५ मार्च रोजी सायंकाळी थाटात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक स्कूल चंद्रपूर येथील प्रशासकीय अधिकारी कमांडर देवाशिष जेना, सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र गौतम, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, एपीआय सचिन राखुंडे, हॉकी असोसिएशनच्या उपाध्यक्ष मनीषा आखरे, संध्या टोगर, पद्मिनी सदभैये, विमाशि संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे आदींची उपस्थिती होती.
आमदार सुधाकर अडबाले पुढे म्हणाले, खेळामध्ये हार-जीत होत असते. पण खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करीत राहिल्यास विजय हा नक्की होत असतो. अशा खेळामधून राज्य, देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू तयार व्हावे, या हेतूने आपण शिक्षक आमदार म्हणून क्रीडा स्पर्धा भविष्यातही घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.
आमदार चषक हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलींचे संघ दाखल झाले असून रोज सायं. ६ ते रात्री १० पर्यंत सामने होणार आहे.
News - Chandrapur