वर्ध्यात बनावट नोटा चलन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- दिल्लीत बनावट नोटांचे कनेक्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा शहरात बनावट नोटा चलनात आणतांना चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल १८८ बनावट नोटा अशी एकूण ९४ हजारांची रक्कम जप्त केली होती. आरोपी पोलिस कोठडीत असताना त्यांनी पोलिसांना या बनावट नोटा दिल्ली येथून आणल्याची कबुली दिली. पण, सोलापूरलादेखील बनावट नोटांची डील करण्यासाठी वर्ध्यातून काही युवक जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बनावट नोटांचे सोलापूर कनेक्शन काय, याचादेखील पोलिसांनी तपास करणे तेवढेच आवश्यक आहे.
वर्धा पोलिसांनी गोपुरी चौकात कारवाई करीत बनावट नोटा जवळ असलेल्या आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी पवनार येथील तीन आणि मदनी गावातील एक अशा चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १८८ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. हा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि क्राईम इंटेलिजन्स पथकाकडे सोपविण्यात आला. आरोपींना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले. २६ हजारांच्या बनावट नोटा विविध ठिकाणी चलनात आणल्याची माहिती दिली. पेट्राेलपंप, पानटपरीवर तसेच बाजारपेठेत बनावट नोटांचे चलन केल्याचे सांगितले. त्यामुळे या नोटा शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. इतकेच नव्हे तर वर्ध्यातील काही युवक बनावट नोटांची डील करण्यासाठी थेट सोलापूरला जाणार होते, अशीदेखील विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्यामुळे त्यांचा तो डाव फसला.
आरोपींनी बनावट नोटा पानटपरी, बाजारपेठ तसेच काही पेट्राेलपंपांवर चलनात आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी जिल्हा अग्रणी बँकेशी पत्रव्यवहार केला. बँकेने याबाबत जिल्ह्यातील सर्वच बँकांना आवश्यक सूचना दिल्याची माहिती आहे.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी याप्रकरणी विविध पथकांना तपासकामी रवाना केल्याची माहिती आहे. आरोपींकडून सखोल चौकशी करून विचारपूस केली जात आहे. त्यांचे मोबाइल लोकेशन तपासले जात आहेत. आरोपींच्या संपर्कात कोण कोण आले त्यांचीदेखील चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस कोठडीदरम्यान आणखी काय हाती लागते, याकडे लक्ष लागले आहे.
News - Wardha