महत्वाच्या बातम्या

 आदर्श दिवाळी !


प्रस्तावना - तमसो मा ज्योतिर्गमय या श्लोकाचा अर्थ : हे भगवंता ! आपण मला असत्याकडून  सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे अशी प्रार्थना आहे. प्रत्येक प्राणिमात्रांची धडपड प्रकाशाकडे जाण्याची असते. ज्या स्थितीत आहोत त्याच्या पुढील स्थितीत जाण्यासाठी, प्रगती करण्याकडे असते. अर्थात नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे जायचे असते. जीवनात सकारात्मकता शिकवणारा, प्रकाशाकडे वाटचाल करण्यास शिकवणारा सण म्हणजे दिवाळी.

सत्याच्या विजयाचे प्रतिक ! - प्रभू श्रीरामचंद्र हे १४ वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवाळीच्या दिवशी अयोध्येत परत आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाने प्रजेला खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीत घरोघरी तुपाचे दिवे लावून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रभू श्रीराम सत्याचे मूर्तिमंत रूप असल्याने त्यांचा विजय  म्हणजे सत्याचाच विजय होता. या विजयाचा उत्सव म्हणून आपण दिवाळी दीपोत्सव, प्रकाशोत्सव म्हणून साजरी करतो.

सकारात्मकता वाढविणारा सण ! - दिवाळी जवळ येताच घर, दुकाने, आस्थापने, आपल्या आजूबाजूचा परिसर, शहर यांची स्वच्छता सुरू होते. जाळे जळमटे काढून रंगरंगोटी केली जाते. तुटक्या फुटक्या साहित्याची डागडुजी होते. त्यामुळे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यांसोबतच वातावरणातील सकारात्मकता वाढते. त्याचा प्रत्येक जिवाच्या मन आणि बुध्दीवर सकारात्मक परिणाम होतो. मनातील नकारात्मकता दूर होऊन आपल्याला आनंद प्राप्त होतो.

गुणवृद्धीसाठी लक्ष्मीपूजन ! - लक्ष्मीपूजन हे अश्विन अमावस्येला संध्याकाळी करतात. तसेच रात्री बारा वाजता अलक्ष्मी निःसारण करतात. शास्त्रानुसार लक्ष्मीपूजनामुळे पूजाकरणाऱ्याला लक्ष्मी तत्वाचा लाभ होतो. तो टिकवून ठेवण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. अधर्माची कास धरली किंवा कर्तेपणा निर्माण झाला तर आपण स्थिर राहू शकत नाही. लक्ष्मी चंचल आहे ! असे म्हणतात, पण खरेच लक्ष्मी चंचल आहे का ? याचे उत्तर नाही असे आहे. ती नेहमीच भगवंताच्या अनुसंधानात स्थिर असते. जेथे अनुसंधान असते, जिथे धर्माचरण असते तिथे लक्ष्मी  विराजमान होते.  ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, समृद्धी आणि संपत्ती याची अधिष्ठात्री देवी श्री लक्ष्मी कमलासनावर विराजमान होऊन समुद्रमंथनातून आली. अशा या लक्ष्मीचे वर्षातून केवळ एकदा पूजन करून ती  प्रसन्न होईल का ? तिला प्रसन्न ठेवायचे असेल तर कमळ ज्या प्रमाणे चिखलातून बाहेर येते त्या प्रमाणे स्वभाव दोषांचा चिखल दूर सारून धर्माचरण करायला हवे. असे धर्माचरण करीत ईश्वराच्या अनुसंधानात रममाण झाल्यास श्री लक्ष्मी हृदयकमळावर निश्चितच विराजमान होईल. तसेच धन धान्याच्या रूपात आपल्याजवळ स्थिर होईल. आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे, तेच खऱ्या अर्थाने अलक्ष्मी निःसारण होय.

सांप्रत काळातील दिवाळीचे बदलते स्वरूप ! - समृद्धीकडे, आनंदाकडे, प्रकाशाकडे नेणारी दिवाळी आहे. परंतु, सद्य परिस्थिती बघता दिवाळी म्हणजे देवता, थोरपुरूष यांची चित्रे असणाऱ्या  फटाक्याची आतशबाजी, चित्रपटातील गाण्यांनी रंगणारी दिवाळी पहाट, डोळ्यांना त्रासदायक आणि घातक ठरणाऱ्या चिनी दीपमाळा आणि आकाशदिवे यांचा झगमगाट या सगळ्यामुळे दिवाळीचे संपूर्ण स्वरूप बदलून गेले आहे. यामुळे  नकारात्मकता वाढते आहे. ज्या लक्ष्मीची घरात पूजा करतो तिचेच फोटो असलेले फटाके फोडून आपण चिंध्या करतो. हे योग्य आहे का ? अश्याने ती प्रसन्न होईल का ? घरात केलेल्या पूजेचा काही परिणाम न होता यातून देवतांचे विडंबन होणार आहे. या विडंबनातून होणारे  पातक जर आपल्या कृतीतून घडत असेल तर ती पूजा फलित होईल का ? त्याचप्रमाणे अश्या चुकीच्या कृतीमुळे  युवा पिढी समोर आपण काय आदर्श ठेवणार ? याचा विचार करायला हवा. स्वदेशी आणि पारंपरिक सहित्यापेक्षा झगमगाट आणि इन्स्टंटकडे कल वाढतो आहे.हि परिस्थिती बदलायला हवी त्यामुळे आपल्याला दिवाळीचा खरा आनंद मिळू शकेल. 

आदर्श दिवाळी साजरी करण्याचे ध्येय घेऊया ! - देवता, थोरपुरूष यांच्या फटाक्यांची विक्री होत असल्यास  हिंदूंनी एकत्र येऊन त्या विषयी प्रबोधन करायला हवे. आपल्या संपर्कात येणाऱ्या बाल आणि युवकांचे प्रबोधन करायला हवे.दिवाळी पहाट मधे होणाऱ्या अशास्त्रीय आणि अश्लील गाण्यांच्या ऐवजी भावभक्ती तसेच देशप्रेम निर्माण करणाऱ्या गाण्यांसाठी आग्रह धरायला हवा.भावी पिढीचा कौशल्य विकास व्हावा, त्यांच्यात हिंदूधर्म - राष्ट्र - संस्कृती विषयी प्रेम आणि कृतज्ञता भाव निर्माण व्हावा यासाठी रांगोळी स्पर्धा, किल्ले स्पर्धा, परिसर स्वच्छता आणि सजावट स्पर्धा घ्यायला हव्या.शरीर आणि पर्यावरणावर  घातक परिणाम करणारे विदेशी आणि चिनी उत्पादने न घेता स्वदेशी आणि हलाल मुक्त उत्पादने घेऊया. त्या विषयी स्वतः जागरूक राहून कृती करुन इतरांनाही जागृत करायला हवे.

अशी आदर्श दिवाळीच आपल्याला मृत्योर्मा अमृतं गमय

अर्थ : मृत्यूपासून जीवनाकडे वाटचाल करायला शिकवते. त्यातूनच आपले जीवन अमृता समान आनंदी होत असते.

आपल्या कुलदेतेचे स्मरण करून तिला प्रार्थना करूया,

हे भगवंता! आपणच आमच्या कडून आदर्श दिवाळी यंदाच्या वर्षी पासून साजरी करवून घ्या. आमच्या वैयक्तिक उन्नती सोबतच राष्ट्र - धर्म यांच्या रक्षणासाठी आणि उन्नतीसाठी आमच्याकडून धर्माचरण करून घ्या हीच प्रार्थना आहे.

सौजन्य  - सनातन संस्था 

संकलन- श्रीमती विभा चौधरी

संपर्क-७६२०८३१४८७





  Print






News - Editorial




Related Photos