शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना कारावास


- गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रस्त्यावर ठेवलेल्या वाहनांची हवा सोडल्यामुळे घरी जावून शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दोन भावंडांना गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम. पाटील यांनी प्रत्येकी एक वर्ष कारावास आणि १२ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सर्जेराव सुधाकर जवळे (२८) आणि राजेंद्र सुधाकर जवळे दोन्ही रा. नवेगाव ता. जि. गडचिरोली अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.    आरोपींच्या गेस्ट हाउस मधील लोकांनी रस्त्यावर गाड्या लावल्यामुळे फिर्यादी संजय वासुदेव भोयर रा. नवेगाव यांनी रस्त्यावर अडथळा होत असल्याने गाड्यांची हवा सोडून दिली. यामुळे आरोपींनी संजय भोयर यांच्या घरी जावून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत संजय भोयर यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी २९ जानेवारी २०१९  रोजी कलम ४४८ , ३२३ , ५०४ , ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार संतोष मरस्कोल्हे यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आज २८ जून रोजी आरोपीविरूध्द सबळ पुरावे असल्याने मुख्य न्यायाधिश बी.एम. पाटील यांनी आरोपी सर्जेराव जवळे व राजेंद्र जवळे यांना कलम ३२३, ३४ भादंवि अन्वये प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येक १ हजार रूपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १ महिना साध्या कारावासाची शिक्षा, कलम ५०६, ३४ भादंवि प्रमाणे प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १ महिना साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४४८, ३४ भादंवि अन्वये प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता योगिता राउत यांनी मा बघितले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार यशवंत मलगाम , कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी काम पाहिले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-28


Related Photos