ठाकूरनगर गावाजवळ वाघाचा वावर : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

- वनविभागाच्या पथकाकडून पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील घोट वनपरिक्षेत्रांतर्गत ठाकूरनगर गावाजवळ मंगळवा २७ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजल्यापासून वाघाचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ गावाजवळच असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहावे, वाघापासून सुरक्षित अंतर राखावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
वनविभागाच्या पथकाने केली पाहणी -
ठाकूरनगर परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर घोट वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक संजय राठोड यांच्यासह वनरक्षक संतोष पवार, गणेश आखाडे, तोरे आणि सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनकर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. गावालगत वाघाचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः शेतीची कामे, जनावरांची देखभाल आणि सरपण गोळा करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
शेतात एकट्याने जाणे टाळा -
वाघाच्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. शेतात किंवा जंगलाच्या दिशेने एकट्याने जाऊ नये. पहाटे आणि रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. शेतात जाणे आवश्यक असल्यास परिसरातील परिस्थितीची माहिती घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. लहान मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. मुलांना एकटे गावाबाहेर, शेतात किंवा जंगलाच्या दिशेने जाऊ देऊ नये. तसेच महिलांनी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वाघ दिसल्यास जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका -
परिसरात वाघ दिसल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाणे, त्याला हुसकावून लावणे किंवा त्याचा पाठलाग करणे टाळावे. वाघाला घेरण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढण्यासाठीही जवळ जाण्याचा धोका पत्करू नये. वाघ दिसल्यास सुरक्षित ठिकाणी राहून वनविभागाला तातडीने माहिती द्यावी.
वनविभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन -
ठाकूरनगर गावाजवळ वाघाचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे. वाघाच्या हालचालींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने वनविभागाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे, एकट्याने शेतात किंवा जंगलात जाणे टाळणे आणि वनविभागाला सहकार्य करणे आवश्यक आहे.




Petrol Price




