राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांकडे साकडे : जिवती, बल्लारपूर, ब्रह्मपुरी तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी, सिंचन, कर्ज, दुष्काळ आणि शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक येथे भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी या तीनही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
धान पिकावर आलेल्या खोडकिडी व करपा रोगामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच मोफत औषधांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.
मनरेगा अंतर्गत २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या विहिरींचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी १०० टक्के मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत शासनाकडून तातडीचा आधार मिळावा, यासाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
शरद पवार यांनी निवेदनातील मागण्यांची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांना लवकर दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे, प्रदेश सरचिटणीस निलेश कराडे, प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि यवतमाळ जिल्हाध्यक्ष वर्षा निकम उपस्थित होते.




Petrol Price




