महत्वाच्या बातम्या

 राजुरातील लॉयड्स मेटल रेल्वे सायडिंगवरून २.५० लाखांचे १७ टायर गायब : दोन ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ नव एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा येथील लॉयड्स मेटलच्या रेल्वे सायडिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून डिस्कसह एकूण १७ टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी झालेल्या टायर व डिस्कची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असून, याप्रकरणी दोन ट्रकचालकांविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एसव्हीए ट्रान्सपोर्टिंग कंपनी रायपूर या कंपनीच्या एकूण १९ गाड्या असून, त्यापैकी १० गाड्या चंद्रपूर-रायपूर मार्गावर धावतात.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीचे दोन ट्रक कोलफाईन माल घेऊन रायपूर येथून भाटिया कोल वॉशरी, पांढरपौनी येथे आले होते. तेथील माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक लॉयड्स मेटल, राजुरा येथील रेल्वे सायडिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाले. यामध्ये ट्रक क्रमांक सीजी २२ एके ७९८२ चा चालक पुष्पेंद्र कुशवाह (वय २४) आणि ट्रक क्रमांक सीजी २२ एके ९२०० चा चालक दीपक कुशवाह दोन्ही रा. सीधी (मध्य प्रदेश) यांचा समावेश होता.

९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून दोन्ही चालकांचे मोबाईल फोन बंद येत असल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, लॉयड्स मेटलच्या रेल्वे सायडिंगवरील सुरक्षा सुपरवायझर इम्रान पठाण यांनी रांगडाले यांना फोन करून दोन्ही ट्रक माल भरण्यासाठी आले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर कंपनीचे सुपरवायझर राकेश रांगडाले यांनी जीपीएसच्या माध्यमातून दोन्ही ट्रकचे लोकेशन तपासले असता ते रेल्वे सायडिंग परिसरात उभे असल्याचे दिसून आले.

सुरक्षा सुपरवायझरने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन्ही ट्रक जागेवर उभे होते; मात्र त्यांचे चालक गायब होते. तसेच ट्रकचे टायर डिस्कसह काढून नेल्याचे आढळून आले. १० ऑक्टोबर रोजी रांगडाले यांनी कंपनीचे मालक विनीतकुमार जैन यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ट्रक क्रमांक सीजी २२ एके ९२०० मधील डिस्कसह आठ टायर, तर ट्रक क्रमांक सीजी २२ एके ७९८२ मधील डिस्कसह नऊ टायर गायब असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळले.

या प्रकरणी राकेशकुमार रांगडाले यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही ट्रकचालक पुष्पेंद्र कुशवाह आणि दीपक कुशवाह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. लोकरे करीत आहेत.





  Print






Related Photos