महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत सहा महिन्यांच्या मादी बिबट्याचा मृत्यू; वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील मामला वनपरिक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक ४१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत एका सहा महिन्यांच्या मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रेल्वेमार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या आठवर पोहोचली असून, एकूण वन्यजीवांच्या मृत्यूंची संख्या १४० च्या पुढे गेली आहे. 

बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्ग हा कावल–ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग आहे. या मार्गावरून वाघ, बिबटे, अस्वल यांसह विविध वन्यप्राणी एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात ये-जा करतात. मात्र, या मार्गावर वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे वन्यजीवांचा बळी जात असल्याने त्यांच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे

घटनेची माहिती मिळताच हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीच्या (एचसीएस) पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून घटनेची शहानिशा केली. मृत बिबट्या अंदाजे सहा महिन्यांचा असल्याची माहिती संस्थेच्या पथकाने दिली. लहान वयातील बिबट्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षित भ्रमणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, नाजिश अली, अभिषेक गजबे, जितेंद्र नोमुलवार, रणजित मडावी, कार्तिक दरणे, वनविकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक कदम व उईके, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन आणि रेल्वे सुरक्षा बलाचे ठोंबरे उपस्थित होते.

या रेल्वेमार्गावर सातत्याने होणारे वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे विभाग आणि वन विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. वन्यजीवांच्या हालचालींसाठी संवेदनशील ठिकाणे निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचा वेग नियंत्रित करणे, सुरक्षित मार्गांची व्यवस्था करणे आणि नियमित निरीक्षण वाढवणे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे.

हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीच्या मते, वन्यजीवांचे अधिवास जोडणारे भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी आणि रेल्वे अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos