महत्वाच्या बातम्या

 स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करा!


- वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पुढाकाराने ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने गडचिरोली येथेही वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी काही वेळ धरणे आंदोलन केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी संजय वानखेडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

वृत्तपत्र विक्रेते हे समाजापर्यंत दररोज सकाळी वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. ऊन, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता पहाटेपासून काम करणाऱ्या या घटकाला मात्र सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने या आंदोलनातून मांडली.

घोषणा झाली; मात्र अंमलबजावणीची प्रतीक्षा -
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेचे उपाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गव्हारे म्हणाले की, १० ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. मात्र, अद्याप या मंडळाच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर या मंडळाची तातडीने अंमलबजावणी करून त्याचा लाभ राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

स्वतंत्र कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना आरोग्यविषयक सुविधा, त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मदत, पेन्शन योजना, घरकुल योजना, वृत्तपत्र विक्रीसाठी स्टॉल उभारण्याकरिता जागा तसेच प्रवासात सवलत अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणीही गव्हारे यांनी केली. या सुविधा उपलब्ध झाल्यास वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा -
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत. मंडळाचे कामकाज सुरू करून त्यामार्फत विक्रेत्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेपर्यंत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि राज्यातील वृत्तपत्र विक्रेते आपला लढा सुरूच ठेवतील, असा इशारा राजेंद्र गव्हारे यांनी दिला.

शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती -
या मोर्चात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा गडचिरोली संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गव्हारे, सचिव लोमेश बांबोळे, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय आकरे, सहसचिव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धिप्रमुख संदीप आकरे, पुरुषोत्तम रोळे, देवेंद्र बारापात्रे, आकाश वैरागडे, उमेश सोनटक्के यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. अपर जिल्हाधिकारी संजय वानखेडे यांना निवेदन सादर केल्यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.





  Print






Related Photos