पशुधनाच्या ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : संतोषी माता प्रभागातील पशुपालकांच्या पशुधनासाठी चारा व चराईकरिता वापरला जाणारा पारंपरिक मार्ग बंद झाल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येची दखल घेत नगराध्यक्ष डॉ. अल्का अनिल वाढई यांनी १८ सप्टेंबर रोजी मुख्य वनसंरक्षक, वाहतूक व विपणन विभाग बल्लारशाह यांना पत्र पाठवून पशुधनाच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
संतोषी माता प्रभागातील अनेक नागरिक वर्षानुवर्षे पशुपालन व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पशुधन चारा व चराईसाठी वनविभागाच्या हद्दीलगत असलेल्या परिसरात जाते. यासाठी सुरक्षा भिंतीमध्ये असलेल्या पारंपरिक मार्गाचा वापर केला जात होता. मात्र, वनविभागाच्या कारवाईनंतर हा मार्ग बंद करण्यात आल्याने पशुपालकांसमोर जनावरे चराईसाठी नेण्याची तसेच परत आणण्याची समस्या निर्माण झाली आहे.
मार्ग बंद झाल्यामुळे पशुपालकांना जनावरे बल्लारपूर-राजुरा महामार्गावरून संबंधित परिसरात न्यावी लागण्याची शक्यता आहे. महामार्गावरून जनावरे नेल्यास त्यांच्या शेणामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच महामार्गाच्या कडेला जनावरे चालत असल्याने अवजड वाहनांना ओव्हरटेक करताना अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता पशुपालकांनी व्यक्त केली आहे.
पशुधन तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून वनविभागाने नियमांनुसार योग्य व सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. अल्का वाढई यांनी पत्राद्वारे केली आहे.
यावेळी नगराध्यक्षांची भेट घेणाऱ्यांमध्ये विजय कैथवास, बृजेश कैथवास, विनोद कैथवास, गणेश ठाकूर, सरिता ठाकूर, मीना पाल, आशा कैथवास, अभय कैथवास, रिक्की कैथवास, रमेश पाल, अजय पाल, सचिन पाल, विक्की पाल, आशा वर्मा, रामनरेश यादव यांच्यासह अन्य पशुपालकांचा समावेश होता.




Petrol Price




