गोंडवाना सैनिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी


- वक्तृत्व स्पर्धेसह स्वच्छता उपक्रम; विद्यार्थ्यांनी दिला राष्ट्रनिर्माणाचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राकेश चडगुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक शहदुल्लाह खान, रहीम पटेल आणि सुनील लोखंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व साधेपणाच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान, जय किसान या संदेशाचे महत्त्व विशद केले.
जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वप्नातील भारत, तर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत २०४७ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कनिष्ठ गटात विभास खेवले याने प्रथम, तर नयन पेंदाम याने द्वितीय क्रमांक पटकावला. वरिष्ठ गटात अंश नरेद्दीवार आणि यथार्थ शेंडे यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला, तर संघर्ष अल्लीवार याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची तसेच स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या योगदानाची माहिती देण्यात आली. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, देशप्रेम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विचार आचरणात आणावेत : डॉ. राकेश चडगुलवार -
अध्यक्षीय मनोगतात डॉ. राकेश चडगुलवार यांनी सांगितले की, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि साधेपणाचा मार्ग दाखविला, तर लालबहादूर शास्त्री यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, स्वावलंबन आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला.
विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. शिस्त, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांच्या माध्यमातून सक्षम व जबाबदार नागरिक घडविणे हीच महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भाषणे, विचारप्रदर्शन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांना उजाळा दिला. तसेच विद्यालय परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून ‘स्वच्छ भारत’ या संदेशाची जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संतोष बोबाटे यांनी केले, तर विरीत टाकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




Petrol Price




