२ ऑक्टोबरला चंद्रपुरात काँग्रेसची अहिंसा संदेश पदयात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य, अहिंसा, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गांधीजींच्या मार्गाने अहिंसा संदेश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गांधीवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले आहे.
पदयात्रेचा प्रारंभ गांधी चौक येथून होणार असून विठ्ठल मंदिर, टॉकीज चौक, रफी अहमद किदवई स्कूल, चोर खिडकी, छोटा बाजार, विजय टॉकीज, अंचलेश्वर गेट आणि दादमहल मार्गे ही पदयात्रा पुन्हा गांधी चौक येथे पोहोचणार आहे. पदयात्रेदरम्यान महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी यांना केवळ जयंतीदिनी अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा आपल्या आचरणात अंगीकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे सुभाष धोटे यांनी म्हटले आहे. समाजात शांतता, सौहार्द आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी अहिंसेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या पदयात्रेत जिल्हा व शहर काँग्रेससह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय, किसान काँग्रेस, अनुसूचित जाती-जमाती विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच काँग्रेसच्या इतर सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. तसेच गांधीवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांनीही २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे उपस्थित राहून अहिंसेचा संदेश बुलंद करावा, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




